चाकण-(प्रतिनिधी)
सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच चाकण आणि राजगुरुनगर यांच्या वतीने संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन १२ मार्च २०२३ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये २८१ श्रद्धाळू भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले, यामध्ये यशवंतराव चव्हाण रक्तपेढीच्या डॉ. मोसलगी यांच्या टीमने २८१ युनिट रक्त संकलन केले.
या शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. दरम्यान या रक्तदान शिबिराला कालीदास वाडेकर , किरण मांजरे साहेब , नितीनशेठ गोरे साहेब ,अंगद जाधव (संयोजक ) तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिरदरम्यान आपले भाव व्यक्त करताना वाडेकर साहेब म्हणाले की निरंकारी भक्तगण चाकण परिसरामध्ये विविध माध्यमातून ज्या सेवा देत आहे हे एक दैविय परोपकाराचे काम आहे. समाजामध्ये लोप पावलेली मानवतेची भावना मिशनचे सेवादार आपल्या सेवेद्वारे जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. संत निरंकारी मिशनद्वारे पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये संत निरंकारी समागमामध्ये करण्यात आले होते, ज्याचे उदघाटन बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी केले होते आणि ही मोहीम मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच चालू असून त्यात आतापर्यंत ७४७७ रक्तदान शिबीर संपन्न झाली असून १२,३२,७९५ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी मानवतेला संदेश दिला कि ‘रक्त नाल्यांमध्ये नाही, नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे’. संत निरंकारी मिशनच्या अनुयायांनी हा संदेश निश्चितपणे चरितार्थ केला असून आज वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशानुसार निरंतर पुढे नेला जात आहे.